प्रशाले विषयी

विलिंगड्न महाविध्यालयाच्या परिसरात उच्च शिक्षण देणार्‍या नामवंत संस्था निर्माण झाल्या तरी पायाभूत असलेली पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणारी संस्था स्थापन झालेली नव्हती. ही उणीव लक्षात घेऊन अशी संस्था स्थापन करण्याचा निर्णय संस्थेच्या अधिकार मंडळाने घेतला. आणि विलिंग्डन महाविध्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रकल्प म्हणून अशी संस्था काढण्याचे ठरविण्यात आले. सुरुवातीला विश्रामबाग परिसरातच कार्यरत असलेली एक अन्य प्रशाला संस्थेने ताब्यात घ्यावी असा विचार करण्यात आला. व त्यादृष्टीने सदर संस्थेच्या अधिकार्‍यांशी वाटाघाटीही करण्यात आल्या. परंतु काही कारणांमुळे ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. त्यामुळे संस्थेने स्वतःची शाळा इंग्रजी व मराठी माध्यमातून सुरू करण्याचे ठरविले. यातील इंग्रजी व मराठी माध्यमातून सुरू करण्याचे ठरविले. यातील इंग्रजी माध्यमाचा विभाग कायमस्वरूपी विनाअनुदानीत ठेवावा आणि मराठी माध्यमासाठी शासकीय अनुदान मिळविण्याचा प्रयत्न करावा असे ठरले आणि प्रशालेची सुरूवात झाली. सुरुवातीला शाळेचे वर्ग संस्थेच्या जुन्या मेसच्या इमारतीमध्ये भरत होते. आणि शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी निधी संकलन आणि देणग्या मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. सुदैवाने सांगलीमधील ख्यातनाम व्यापारी वा उद्योगपती आणि शिक्षणप्रेमी असलेली मा. महेशभाई व किरिटभाई शहा यांनी रुपये २५ लाखाची उदार देणगी द्यायचे मान्य केले आणि संस्थेचे हितचिंतक कै. कांतीलालभाई शहा यांचे नाव या प्रशालेस देण्याचे संस्थेने मान्य केले. २५ एप्रिल १९९९ ला हा नामकरण सोहळा ख्यातनाम शास्त्रज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू कै. वि. गो. भिडे यांचे हस्ते संस्थेने बांधलेल्या इमारतीच्या पहिल्या टप्प्याच्या परिसरात पार पडला. सुरुवातीचा काळ जरी सर्व प्रकारच्या अडीअडचणीतून गेला तरी यथावकाश एक गुणवंत आणि नामवंत प्रशाला म्हणून या प्रशालेने नावलौकिक प्राप्त केला आहे.

आता या संपूर्ण प्रशालेस शासन मान्यता असून प्राथमिक व माध्यमिक मराठी विभागास १०० टक्के शासन अनुदान मिळत असून इंग्रजी विभाग विनाअनुदान तत्वावर चालविला जातो.