Blog Details

चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे महत्व

चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे महत्व
Dr. Sharad Kunte

Dr. Sharad Kunte

२३ ऑगस्ट २०२३  हा दिवस भारतीयांच्या विशेष करून लक्षात राहणारा आहे.  कारण भारताच्या अंतराळ विज्ञान संस्थेने त्यादिवशी एक विक्रम नोंदवला.  इस्रोचे चंद्रयान हे केवळ चंद्रावर पोहोचले असे नाही, तर जिथे आजपर्यंत इतर कोणत्याही देशाचे यान पोहोचले नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ चंद्रयान सुरक्षितपणे उतरले व त्या ठिकाणी अपेक्षित असलेले आपले संशोधनाचे कामही त्या यानातील उपकरणांनी व्यवस्थितपणे सुरू केले.  हे यश तीनच दिवस आधी रशियन यानाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर विशेष ठळकपणाने उठून दिसते, म्हणून भारतीयांच्या विशेष महत्त्वाचे वाटले.

अनाठाई खर्च? 

 चंद्रावर यान उतरवण्यासाठी केलेला खर्च गरजेचा होता का? भारतात आजही कोट्यवधी नागरिक दारिद्र्यरेषेखाली जगत असताना त्यांची प्रगती घडवून आणण्यासाठी काही खर्च करण्यापेक्षा चंद्रयानावर खर्च करणे भारत सरकारला एवढे महत्त्वाचे का वाटले? असे प्रश्न निश्चितच आपल्या देशातील काही नतदृष्ट लोकांनी उपस्थित केलेले आहेत.  अशा काही विद्वानांनी वर्तमानपत्रांना मुलाखतीही दिलेल्या आहेत.  असे प्रश्न उपस्थित करण्यामागे त्यांचे स्वार्थ काय होते? हा प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवूया.  खरोखरच चंद्रयान उतरवण्याचा खर्च अनाठायी होता का? या विषयाची चर्चा मात्र केलीच पाहिजे.  

 आपण एक साधे उदाहरण पाहू.  एखादा माणूस कितीही गरीब असेल, तरीही तो त्या तुटपुंजा उत्पन्नातून देखील काही ना काही काटकसर करून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतोच.  वेळ प्रसंगी अर्धपोटी राहून देखील तो मुलाला चांगल्या शाळेत घालण्याचा आग्रह धरतो.  त्यासाठी अधिकची फी द्यायची देखील त्याची तयारी असते.  त्याचे कारण त्या माणसाला हे माहीत असते की, आज माझा मुलगा शिकला तर तो उद्या पुष्कळ अधिक पैसे मिळवेल व आपले घर दारिद्र्यातून बाहेर येईल. आज शिक्षणाच्या खर्चात काटकसर केली तर उद्या दारिद्र्यातून बाहेर येण्याचा मार्ग सापडणारच नाही.  हे जसे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे, तसेच राष्ट्राच्या बाबतीतही आहे.  कितीही अडचणी असल्या तरी संशोधन व तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये टाळाटाळ करून चालणार नाही.  त्या खर्चात काटकसर करून चालणार नाही.  कारण तंत्रज्ञानाचा विकास केला तरच देशामध्ये समृद्धी निर्माण करता येते, व आज दारिद्र्यामुळे सर्व सामान्य माणसासमोर असलेल्या अडचणी दूर करता येतात, हे प्रत्येक राष्ट्र प्रमुखाला चांगले समजते.  आज रशिया, अमेरिका अथवा युरोपमधील जी राष्ट्रे स्वतःला विकसित देश म्हणवितात, त्यांनी ही स्थिती कशी प्राप्त केली? त्याचे एकच उत्तर आहे की त्यांनी आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान शोधून काढले व ते उपयोगात आणले.  सर्वसामान्य माणूस जेवढ्या अधिक प्रमाणात तंत्रज्ञानाचा उपयोग करेल, तेवढी त्याची आर्थिक क्षमता वाढत जाते व जेवढ्या अधिक व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न होत जातील, तेवढे राष्ट्र विकसित होत जाते. चंद्रावर इस्रो ने आपले अवकाश यान उतरवले याचा व्यावहारिक अर्थ हा आहे की इस्रो ने अत्यंत प्रगत असे तंत्रज्ञान स्वतः विकसित केले व चंद्रयानाच्या निमित्ताने ते तंत्रज्ञान जगाला प्रदर्शित केले. आपण तंत्रज्ञानाचा विकास करतो आहोत म्हणजेच देशातल्या दारिद्र्यावर मात करण्याचा उपाय शोधतो आहोत.  

 

तंत्रज्ञान विकासाचा उपयोग काय?  

 कोणत्याही तंत्रज्ञानाचा विकास केला तर ते तंत्रज्ञान जीवनाच्या इतर अनेक क्षेत्रांमध्ये निश्चितच उपयोगी पडते. याची कितीतरी उदाहरणे सांगता येतील.  भारताने अंटार्टिका वर आपल्या मोहिमा यशस्वी केल्या, आज त्या ठिकाणी आपण तीन संशोधन केंद्र स्थापित केलेली आहेत. अंटार्टिका वरील तापमान शून्याच्या खाली १०० ते १५० डिग्री इतके कमी असते.  तिथे वर्षातील बाराही महिने बर्फच असतो.  अशा परिसरामध्ये माणसाने कोणते कपडे वापरले पाहिजेत? कोणते अन्न खाल्ले पाहिजे? आपली वाहने कशा प्रकारे विकसित केली पाहिजेत? याचा आपण अभ्यास केला.  त्या सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला सियाचीनच्या लढाईमध्ये झाला.  सियाचीन ही जगातील सर्वोच्च रणभूमी आहे.  चीन व पाकिस्तानच्या सरहद्दीला लागून असलेला तो एक ग्लेशियर आहे.  या ग्लेशियरवरून या दोन्ही देशांच्या सैन्य हालचालींवर नेमके लक्ष ठेवता येते.  आवश्यकता असेल तर या सैन्य हालचालींना प्रतिबंध देखील करता येऊ शकतो.  सियाचीनवर भारताने वर्षातील बाराही महिने आपला सैन्य तळ सक्रिय ठेवलेला आहे.  या ठिकाणी आपल्या सैनिकांचा निवास करण्यासाठी भारताने जे तंत्रज्ञान वापरले, ते सियाचीन मोहिमेमध्ये विकसित झालेले होते.  

 इस्रोच्या अवकाशयानांना अति उंचीवर नेण्यासाठी क्रायोजनिक इंजिनांची निर्मिती केली.  क्रायोजनिक तंत्रज्ञान हे फक्त अवकाशयानातच वापरता येते असे नाही.  या तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारताने आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तयार केलेली आहेत.  अग्नी-५, अग्नी-६, सूर्य, या क्षेपणास्त्रांमध्ये क्रायोजनिक इंजिनांचा उपयोग केलेला आहे.  हे तंत्रज्ञान अवगत केल्यामुळे भारत आता जगातील कोणत्याही देशावर क्षेपणास्त्रांनी हल्ला करू शकतो.  त्यामुळे आपल्यावर आक्रमण करण्यापूर्वी इतर कोणताही देश दहा वेळा विचार करेल.  

 भारताने स्वतः तंत्रज्ञान विकसित करून नाविक ही स्थलनिश्चिती प्रणाली तयार केलेली आहे.  या प्रणालीच्या मदतीने गुगल प्रमाणेच आपण कोणताही पत्ता शोधून काढू शकतो, आपले ठिकाण इतरांना नेमकेपणाने कळवू शकतो, समुद्रामध्ये संचार करणाऱ्या जहाजांना अथवा आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांना नेमकी दिशा देऊ शकतो, किंवा कारगिल युद्धामध्ये ज्याप्रमाणे शत्रूचे सैनिक उंच पहाडांवर लपून बसलेले होते अशा परिस्थितीत शत्रूची नेमकी ठिकाणे शोधून काढून त्यांना नेस्तनाबूत करू शकतो.  त्यामुळे तंत्रज्ञान एका कामासाठी तयार केले गेले, तरी समाजाच्या इतर अनेक गरजा त्या तंत्रज्ञानाने भागू शकतातच. चांद्रयान निर्मितीसाठी इस्रोने जे तंत्रज्ञान तयार केलेले आहे, यानिमित्ताने आपल्या अवकाशयानाने, विक्रम लेंडरने व प्रज्ञान बग्गीने जे प्रयोग केलेले आहेत, त्यांचा आपल्याला इतर अनेक विकास प्रक्रियांमध्ये वापर करता येणार आहे, ही आपल्या दृष्टीने सर्वात अधिक महत्त्वाची गोष्ट आहे.  

 अद्ययावत तंत्रज्ञान कोणीही कोणाला सहजासहजी देत नाही 

जगातील प्रत्येक देशाचा विकास हा तंत्रज्ञानाच्या आधारेच झालेला आहे व या गोष्टीची प्रचिती प्रत्येकाला असल्यामुळे आपल्या देशाला आपल्या तंत्रज्ञानामुळे स्पर्धक निर्माण होऊ नये, याची काळजी जगातील प्रत्येक विकसित देश घेत असतो.  त्यामुळे कोणताही विकसित देश इतरांना आपले उच्च तंत्रज्ञान कधीही देत नाही.  ज्यावेळी क्रायोजनिक इंजिन भारताला हवे होते त्यावेळी ते इंजिन देण्यास अथवा त्याचे तंत्रज्ञान देण्यासही अमेरिका व रशिया या दोन्ही प्रगत देशांनी नकार दिलेला होता.  ज्यावेळी भारताला सुपर कॉम्प्युटरची गरज होती त्यावेळी हा सुपर कॉम्प्युटर अथवा त्याचे तंत्रज्ञान देण्यास जगातील कुठल्याच देशाने भारताला सहाय्य केले नाही.  अगदी शेतीसारखे मूलभूत तंत्रज्ञान देखील भारताला डॉक्टर स्वामीनाथन यांच्या माध्यमातून आपले आपणच विकसित करावे लागले.  जोपर्यंत भारत अमेरिकेकडून गहू व मिलो आयात करत होता तोपर्यंत अमेरिकेलाही शेतीतील प्रगत तंत्रज्ञान भारताला कधीही द्यावेसे वाटले नाही.  कुरियन यांनी दुध क्रांती आपल्या देशात घडवून आणली, ती आपल्या देशात तयार झालेल्या तंत्रज्ञानाच्या आधारेच घडवून आणली.  ते तंत्रज्ञान कोणीही आपल्याला बाहेरून उसने दिले नाही.  इस्रो ने यशस्वी केलेल्या चंद्रयान मोहिमेचे महत्त्व यासाठी आहे की या अवकाशयानासाठी गरजेचे असलेले प्रत्येक प्रकारचे तंत्रज्ञान आपल्या शास्त्रज्ञांनी स्वतः विकसित केलेले आहे, त्यासाठी आपण जगातल्या कुठल्याही देशावर अवलंबून राहिलेलो नाही.शास्त्र विषयाच्या अभ्यासकांची प्रतिष्ठा वाढली

 भारतामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला विचारले की तुला मोठेपणी काय व्हायचे आहे? तर त्याची दोन-तीन उत्तरे ठरलेली आहेत.  एक तर डॉक्टर व्हायचे किंवा वकील व्हायचे किंवा बँकेत नोकरी करायची.  जमलेच तर एमपीएससी अथवा यूपीएससीची परीक्षा देऊन मोठा सरकारी अधिकारी व्हायचे. यापेक्षा अधिक प्रतिष्ठा देणारी किंवा अधिक आर्थिक लाभ मिळवून देणारी अशी कुठली शाखा असू शकते, याची विद्यार्थ्यांना आज कल्पनाच नाही.  शास्त्रज्ञ होणे ही तर कोणाच्याही विचारातली गोष्टही नाही.  परंतु इस्रोच्या या दैदिप्यमान यशामागे आपले हजारो शास्त्रज्ञ आहेत हे ज्यावेळी सर्व जगाला कळले, तेव्हा शास्त्रज्ञांची आपल्या देशात प्रतिष्ठा वाढली. आज शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी असे म्हणू लागतील की मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे, व माझ्या प्रयत्नातून एखादे अवकाश यान भारताला सोडता आले पाहिजे.  

 आपल्या देशामध्ये बुद्धिमान युवकांची अजिबात कमी नाही. अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम नाव कमावणारे विद्यार्थी व्यवसाय करण्यासाठी अथवा नोकरीसाठी मात्र परदेशात जातात, कारण त्यांना असे वाटते की आपल्या बुद्धिमत्तेला या देशात वाव मिळत नाही.  इस्रोच्या या दैदीप्यमान यशामुळे आपल्या देशात बुद्धिमान विद्यार्थ्यांना चांगला वाव मिळू शकतो, हा विश्वास या युवकांच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, व निराशेपोटी भारत सोडून परदेशामध्ये स्थायिक होण्याचा विचार युवकांच्या मनात येणार नाही.  


 जगभरात भारताची प्रतिमा उंचावली 

 भारत हा एक दरीद्री देश आहे, साप गारुड्यांचे खेळ करणारी माणसे या ठिकाणी राहतात, असा अजूनही पाश्चात्य देशांमध्ये समज आहे. आपल्या देशात विज्ञान व तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झालेली आहे की भारता व्यतिरिक्त केवळ तीनच देश चंद्रयान मोहीम आजवर यशस्वी करू शकलेले आहेत.  या गोष्टीमुळे भारतासंबंधीचे जगभरातील लोकांचे गैरसमज आपोआप दूर होतील.  भारताची प्रतिष्ठा जगभरात निश्चितच वाढीला लागेल. १९९८ साली भारताने जेव्हा अणूस्फोट केलेला होता त्यावेळी जगभरातील भारतीयांना हा अनुभव आलेला होता की त्या देशातील स्थानिक नागरिक भारतीयांच्याकडे अधिक सन्मानाने पाहू लागले. हे एका समर्थ देशाचे नागरिक आहेत अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.  चांद्रयान मोहीम यशस्वी केल्यामुळे जगभरातील भारतीयांना असाच अनुभव येईल.  तेथील स्थानिक नागरिक भारतीयांकडे बघताना हे विज्ञान व तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या देशाचे नागरिक आहेत या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाईल.  

 चंद्रयान- २ मोहिमेतील अपयश धुवून काढले 

 चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी आखलेली ही तिसरी मोहीम होती.  चंद्रयान- १ हे केवळ चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे अवकाशयान होते.  या यानाने चंद्राच्या भूपृष्ठाचा अंदाज घेण्यासाठी त्यावर केवळ एक प्रोब फेकण्याचे काम केले होते.  या यानाच्या भ्रमणामध्ये चंद्रावर पाणी असल्याचे निश्चित पुरावे आपण जगाला मिळवून देऊ शकलो होतो.  त्यामुळे चंद्रयान- १ एक ही मोहीम अपयशी म्हणता येणार नाही. चंद्रयान-२ या मोहिमेमध्ये आपण आणखी एक पुढचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न केला होता. या  मोहिमेत  चंद्राभोवती फिरत राहणारे एक अवकाश यान असणारच होते व त्यावरून चंद्रावर उतरणारे लेंडर व त्यातून संशोधनासाठी बाहेर पडणारी बग्गी आपण तयार केली होती.  बाकी सर्व टप्पे यशस्वी झाले.  अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे शेवटच्या १५ मिनिटांमध्ये या लॅन्डरचा प्रवास थोडा चुकला व सावकाश चंद्रावर उतरण्याऐवजी वेगाने आदळून त्या यानाचे तुकडे उडाले.  हे अपयश आपल्या शास्त्रज्ञांना निश्चितच टोचत होते.  त्यामुळे अपयश मिळालेल्या दिवशीच पुढच्या विजयी मोहिमेचा संकल्प आपल्या शास्त्रज्ञांनी केला होता.  अवघ्या चारच वर्षात चंद्रयान- ३ ची मोहीम इस्रोने आखली व ती यशस्वी करून दाखवली.  यावेळी चंद्र भूमीवर अतिशय सावकाश पद्धतीने आपले लेंडर उतरले व त्यातून संशोधन करणारी बग्गी देखील यशस्वीपणे बाहेर पडली. आपल्या या यशाबद्दल शास्त्रज्ञांना एवढा आत्मविश्वास होता, की सरकारच्या वतीने सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये, सार्वजनिक आस्थापनांमध्ये व सरकारी कार्यालयांमध्ये देखील चंद्रयानाच्या मोहिमेचा अंतिम टप्पा दाखवला जावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.  त्याप्रमाणे देशभरातील करोडो नागरिकांनी इस्रोने पाठवलेल्या लिंक वर जाऊन हे लँडिंग प्रत्यक्ष पाहिले.  शास्त्रज्ञांना हा जो आत्मविश्वास आला तो त्यांनी नव्याने शोधून काढलेल्या विविध तंत्रज्ञानामुळे आलेला होता.  ही मोहीम यशस्वी करून आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रयान- २ च्या अवतरणातील अपयश धुवून  काढले व याहीपेक्षा अधिक कठीण मोहिमा नजीकच्या काळामध्ये हाती घेण्याचा संकल्प देखील घोषित केला.  

 चंद्राचे अंतर पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटर पेक्षा अधिक आहे.  इतक्या दूर अंतरावर योग्य ते आदेश पाठवून ऑर्बिटर, लेंडर व रोव्हर यांच्या योग्य त्या हालचाली घडवून आणणे ही सोपी गोष्ट नाही.  त्यामुळे शेवटच्या पंधरा मिनिटाच्या टप्प्यासाठी शास्त्रज्ञांनी आधीच एक प्रोग्रॅम तयार करून दिलेला होता.  या प्रोग्रॅम नुसार यानाचा वेग व उंची कमी होणे, ते काही काळ जमिनीला समांतर स्थितीमध्ये चंद्रापासून काही मीटर अंतरावर स्थिर राहणे, उतरण्यासाठी योग्य जागा निवडणे व त्या जागी सावकाश उतरणे, या सर्व प्रक्रिया आधी तयार करून दिलेल्या प्रोग्रॅम नुसार स्वयंचलित पद्धतीने होत होत्या.  या प्रक्रिया पृथ्वीवरून नियंत्रित करण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती, व तशी काही आवश्यकता ही पडली नाही.  इतक्या उत्तम पद्धतीने चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया पृथ्वीवरून नियंत्रित करण्यामध्ये आपल्याला जे यश मिळाले ते अभूतपूर्व असेच म्हटले पाहिजे कारण त्या ठिकाणी ०.०१ सेकंदाची चूक देखील मोठा अपघात घडवून आणू शकत होती.  दूर वरून हे प्रक्षेपण पाहत असलेल्या कोट्यावधी नागरिकांच्या हृदयाचे ठोके धडधडत होते, परंतु आपण केलेल्या प्रोग्रॅम बद्दल शास्त्रज्ञ इतके आश्वस्त होते की एक एक टप्पा पार पडल्यावर आधी ठरवल्या प्रमाणे चांद्रयानाच्या कृती होत असल्याचा आनंद व्यक्त करण्यापलीकडे त्यांना अन्य काही करावे लागले नाही, अन्य कोणत्याही प्रकारचे दडपण त्यांच्यावर आले नाही. आपल्या शास्त्रज्ञांच्या नियोजनाचा, व तंत्रज्ञानाचा हा फार मोठा विजय मानला पाहिजे.   

 स्थानिक उद्योगांना चालना  

 चंद्रयान मोहीम ही कमीत कमी खर्चात इस्रोने राबविली यामागे अनेकांचे योगदान आहे.  अवघा सहाशे कोटी रुपये खर्च या मोहिमेसाठी आला. बॉलीवूडचे काही सिनेमे देखील यापेक्षा अधिक बजेटचे असतात.  इतक्या कमी खर्चामध्ये ही मोहीम कशी पार पाडली गेली त्याचे दोन आयाम आहेत. एक तर कमीत कमी ऊर्जा खर्च करून अधिकाधिक शास्त्रीय माहिती एकत्रित करण्याची योजना शास्त्रज्ञांनी बनवली. त्यामुळे थोडा अधिक काळ या मोहिमेला लागला तरीही मोहिमेचा खर्च कमी झाला. दुसरा आयाम आहे या देशातील अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांचा लागलेला हातभार. अगदी लहान उद्योग, मध्यम उद्योग व मोठे उद्योग अशा तीनही प्रकारच्या जवळपास साडेसातशे उद्योगांनी काही ना काही छोटे भाग या मोहिमेसाठी तयार करून दिलेले आहेत व तेही अत्यल्प खर्चामध्ये करून दिलेले आहेत.  यामुळे त्या प्रत्येक भागाची गुणवत्ता अधिक चांगली राहण्यास मदत झाली, एकूण मोहिमेचा खर्च कमी झाला व त्याचबरोबर त्या त्या उद्योगांमध्ये नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले.  इस्रोच्या या कमी खर्चात मोहीम पार पाडण्याच्या व अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना सहभागी करून घेण्याच्या धोरणामुळे आता इस्रोचे नाव जगभरात गाजले आहे व प्रगत देश देखील आपल्या अवकाश मोहिमा खर्च वाचविण्यासाठी इस्रोच्या माध्यमातून राबविण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.  ज्या प्रकारची मोहीम भारताने राबवली त्या प्रकारची मोहीम राबविण्यासाठी अमेरिकेच्या नासा या अवकाश एजन्सीला दहापट अधिक खर्च आला.  त्यामुळे नासाचे वैज्ञानिक देखील आपल्या अवकाश मोहिमा कमी खर्चात पार पाडण्यासाठी मदत घेण्याच्या विचारात आहेत. भारताला फार मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देण्याची आपली क्षमता इस्रोने सिद्ध करून दाखविलेली आहे. तंत्रज्ञान विकास, आर्थिक लाभ व छोट्या मोठ्या उद्योगांचा विकास या सर्वच गोष्टी यातून साध्य होणार आहेत.  

 विविध शास्त्रीय प्रयोग 

 चांद्रयान मोहिमेच्या आयोजनातील यशाचे अनेक टप्पे आपण पाहिले.  परंतु प्रत्यक्ष जे संशोधन करण्यासाठी हे चंद्रयान पाठवले गेलेले आहे, ते संशोधन कोणत्या प्रकारचे आहे याचीही माहिती या निमित्ताने घेतली पाहिजे.  ऑर्बिटर, लॅन्डर व रोव्हर हे चांद्रयानाचे तीन प्रमुख भाग आहेत.  यापैकी प्रत्येक भागाकडे संशोधनाची काही ना काही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.  

 ऑर्बिटर हा चंद्राभोवती प्रदक्षिणा करत राहणारा चंद्रयानाचा भाग आहे.  त्याच्यावर बसविलेले सेंसर पृथ्वी वरून येणाऱ्या विविध प्रकारच्या प्रकाश किरणांचे विश्लेषण करून तेथे घडणाऱ्या अनेक जैवभौतिक घटनांचे विश्लेषण करणार आहेत.  निसर्गचक्रामध्ये होणारे बदल, जंगलांचे घटणारे क्षेत्र, मानवाने केलेल्या प्रदूषणामुळे निसर्गाचा होणारा ह्रास, वादळ, त्सुनामी, अतिवृष्टी अशा प्रकारच्या आपत्ती विविध भागात निर्माण होण्याची शक्यता, या ऑर्बिटरच्या अभ्यासातून तपासून पाहता येतील.  ऑर्बिटर वरील सेन्सर्स हे विश्वाच्या विविध भागातून येणाऱ्या प्रकाश किरणांचे (सेस्मिक रेज) विश्लेषण करतील.  यातून हवामानाच्या अडथळ्यामुळे पृथ्वीपर्यंत येऊन न पोहोचणारे प्रकाश किरण सहजपणे अभ्यासले जातील व विश्वातील ग्रह गोल, तारे, आकाशगंगा यांच्यातील क्रिया प्रतिक्रिया यांचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.  

 विक्रम लँडर हे चंद्रावर एका जागी स्थिर राहणार आहे.  या लॅन्डरला अनेक प्रकारचे सेन्सर बसविलेले आहेत.  चार महत्त्वाची कामे हे लॅण्डर करणार आहे. 

  १) त्यातील आय एल  एस ए  म्हणजे (इन्स्ट्रुमेंट फॉर लियनर सेस्मिक ऍक्टिव्हिटी)  हे उपकरण चंद्रावरील भूकंप मापनाचे काम करणार आहे. चंद्राच्या अंतर्भागात होणाऱ्या घडामोडी व चंद्राच्या पृष्ठभागावर येऊन कोसळणाऱ्या अशनी या दोन्हीमुळे अशा प्रकारची कंपन निर्माण होऊ शकतात.  या कंपनांचा अभ्यास केल्यामुळे चंद्राच्या जडण घडणी विषयी किंवा चंद्राच्या उत्पत्ती संबंधित देखील अधिक चांगली माहिती उपलब्ध होऊ शकेल.  २) सीएसएफई म्हणजे (चांद्रयान सर्विस थर्मो फिजिकल एक्सपरिमेंट) हे उपकरण चंद्रपृष्ठाचे व पृष्ठभागापासून काही अंतरापर्यंत असलेल्या क्षेत्राच्या तापमानात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करेल.  दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान उतरलेले असल्यामुळे त्या ठिकाणी तापमान फार तीव्र असत नाही.  अगदी दुपारच्या वेळी देखील तेथे जास्तीत जास्त ५५ c एवढे तापमान असते. सूर्यकिरण तेथे अगदी तिरक्या रेषेत येऊन पडतात. रात्रीच्या वेळी हे तापमान - २३0  c  डिग्री पेक्षाही खाली जाऊ शकते.  या तापमानातील बदलांचा व त्यामुळे चंद्र पृष्ठभागावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास हे उपकरण करेल.  

३) आर ए एस डी एच ए म्हणजे (रेडिओ ॲनाटोमी ऑफ मून बाउंड  हायपर सेंसिटिव्ह आयनोस्फिअर अँड ॲटमोस्फियर ) हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाच्या विद्युत चुंबकीय गुणधर्मांचा अभ्यास करेल.  चंद्राच्या वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये असलेली विद्युत वाहकता तपासून पाहण्याचे काम हे उपकरण करू शकेल.  यातून चंद्रभूमीवर असलेल्या विविध खनिजांच्या अस्तित्वाची शक्यता पडताळून पाहता येईल,  

४) भारताने पाठवलेल्या काही उपकरणांबरोबरच नासाने एक उपकरण चांद्रयानाबरोबर पाठविलेले आहे.  हे उपकरण आहे लेसर रिफ्लेक्टर ॲरे.  या उपकरणाद्वारे लेझर किरण पृथ्वीवर पाठवले जातील व पृथ्वीवरून परावर्तित झालेले लेझर किरण पुन्हा हे उपकरण ग्रहण करेल.  या प्रवासाला लागलेला वेळ मोजून चंद्राचे पृथ्वीपासून असलेले अचूक अंतर मोजले जाईल.  चंद्राच्या कलांप्रमाणे हे अंतर सतत बदलत असते.  या बदलाचा वेळ व त्याचबरोबर चंद्राचे पृथ्वीपासून वाढत असलेले सरासरी अंतर यांचा अभ्यास या उपकरणा मार्फत केला जाईल.  

 प्रज्ञान रोव्हर हे सेकंदाला एक सेंटीमीटर या वेगाने लँडर च्या आजूबाजूला अर्धा किलोमीटर परिसरामध्ये फिरून चंद्रभूमीचे अध्ययन करणार आहे.  यावर दोन उपकरणे बसविलेली आहेत.  ए पी एक्स एस (अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रॉमीटर) व एल आय बी एस (लेसर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप) ही ती दोन उपकरणे आहेत . 

  यातील एका उपकरणाच्या माध्यमातून चंद्रभूमीचे रासायनिक पृथक्करण केले जाईल.  तेथील माती व खडकांमध्ये कोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात आहेत याचा अभ्यास केला जाणार आहे.  त्यामुळे चंद्रावर कोणत्या प्रकारची खनिजे सापडू शकतील याची माहिती जमा होईल.  सर्व जगाला चंद्रभूमीवरील तीन प्रमुख खनिजांची अपेक्षा आहे.  त्यातले एक आहे लिथियम, दुसरे आहे टिटॅनियम व तिसरे आहे हेलियम- ३.  लिथियम हे सोलर बॅटरी मध्ये उपयोगी पडणारे मूलद्रव्य आहे.  त्याच्यामध्ये चंद्रावर उपकरणांच्या बॅटऱ्या चार्ज करून घेऊन दीर्घकाळ चालणारी उपकरणे बनवता येऊ शकतात.  टिटॅनियम हा अतिशय मजबूत धातू असून पाणबुड्या, रणगाडे अथवा विविध शस्त्रास्त्रे, यंत्रसामग्री यांच्या निर्मिती मध्ये टिटॅनियम चा फार महत्त्वाचा उपयोग आहे.  हे मूलद्रव्य पुरेशा प्रमाणात पृथ्वीवर सापडत नाही.  ते चंद्रावर सापडू शकेल व तिथून मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर आणता येईल अशी जगभरातल्या शास्त्रज्ञांची अपेक्षा आहे.  हेलियम- ३ या मूलद्रव्याच्या मदतीने आण्विक प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते.  हा वायू गोळा करून पृथ्वीवर आणता आला तर एखाद्या अणू भट्टीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर व प्रदीर्घ काळ उर्जा निर्मिती करणारे साधन उपलब्ध होऊ शकेल. हेलियम- ३ सारखे इंधन अवकाशयानांमध्ये भरून ती सूर्यमालेच्या बाहेर देखील अभ्यासासाठी पाठवता येऊ शकतील.  त्यामुळे या मूलद्रव्याचा साठा तेथे उपलब्ध झाला तर तो भारताचा फार मोठा शोध ठरेल.  

दुसऱ्या उपकरणाने चंद्रावरील माती अथवा खडकात सापडणारी विविध संयुगे, पाणी तसेच विविध नैसर्गिक क्षार अभ्यासले जातील. या संयुगांच्या अभ्यासातून कधीकाळी चंद्रावर जीवसृष्टी होती का हे अभ्यासता येईल.  चंद्रावर पूर्वी वातावरण अथवा पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते का? यासंबंधीचीही माहिती मिळेल. चंद्राच्या मातीमध्ये वनस्पतीच्या वाढीला उपयोगी पडणारी पोषकद्रव्ये उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी कृत्रिम रीतीने वनस्पती वाढविण्याचाही प्रयोग करता येईल. या प्रक्रियेतून चंद्रावर दीर्घकाळ राहणाऱ्या अवकाश यात्रींना अन्न उपलब्ध करून देणे शक्य होईल.   सहजपणे पाणी उपलब्ध होऊ शकले, तर पाण्याचे पृथक्करण करून हायड्रोजन हे इंधन व ऑक्सिजन पुरेशा प्रमाणावर मिळवता येईल.  या दोन साधनांच्या मदतीने चंद्रावरून पृथ्वीवर परत घेऊन येणारे रॉकेट तयार करता येईल.  इतक्या सर्व शक्यता या १४ दिवसाच्या प्रयोगांमध्ये आजमावून पाहण्याचे काम प्रज्ञान रोव्हर करणार आहे.  

 चंद्राचा दिवस हा पृथ्वीवरील चौदा दिवसांच्या एवढ्या लांबीचा असतो. चंद्रयान चंद्रभूमीवर उतरले ते तेथील दिवस सुरू होतानाच.  त्यामुळे पुढील १४ दिवस लॅन्डर व रोव्हर यांना चंद्रावरील उपलब्ध सूर्यप्रकाशात काम करता येणार आहे.  तेथील तापमान फार उच्च नसल्यामुळे या दोन्ही साधनांवरील उपकरणे कोणताही अडथळा न येता काम करू शकतील. चंद्रावरील रात्र सुरू झाली की तेथील तापमान झपाट्याने कमी होत जाते व अतिशय शीत तापमानामध्ये ही सर्व उपकरणे काम करू शकतील हे जवळजवळ अशक्य आहे.  पुन्हा १४ दिवसानंतर चंद्रावर जेव्हा सूर्योदय होईल त्यावेळी रोव्हर व लॅन्डरवरील बॅटऱ्या या पूर्णपणे डिस्चार्ज झालेल्या असतील.  त्या पुन्हा चार्ज  होऊन उपकरणे काम करू शकतील की नाही याविषयी शंका आहे. त्यामुळे ही उपकरणे १४ दिवसच काम करतील असे सध्या गृहीत धरलेले आहे.   

 यशाकडून अधिक मोठ्या यशाकडे 

 चांद्रयान- ३ ही मोहीम यशस्वी झाल्याचे अनेक परिणाम आता दिसून येत आहेत.  जगातल्या सर्व राष्ट्र प्रमुखांनी व त्या त्या ठिकाणी असलेल्या शास्त्रज्ञ समूहांनी इस्रो चे तोंड भरून कौतुक केलेले आहे. यात भारताचा सदैव द्वेष करणारे चीन व पाकिस्तान सारखे देशही मागे राहू शकलेले नाहीत. याचा एक मोठा फायदा इस्रोला नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे.  नासाने अमेरिकेत जेव्हा अनेक अवकाश योजना यशस्वीपणे राबवल्या, त्यावेळी अमेरिकेतील अनेक खाजगी उद्योजक अवकाश संशोधन विषयाकडे आकर्षित झाले. त्यांनी भांडवल घालून स्वतःची प्रक्षेपण यंत्रणा तयार केली.  त्यातून नागरिकांना स्वखर्चाने अवकाश यात्रा करून आणण्यासारखे उपक्रमही सुरू केले.  या उपक्रमांना मोठी प्रसिद्धी मिळत राहिली.  त्या सर्वांचा फायदा नासाला असा झाला की पूर्वीपेक्षा पुष्कळ अधिक भांडवल खाजगी क्षेत्राकडून त्यांच्याकडे येऊ लागले. अशाच प्रकारे इस्रो ने आपले अभियान यशस्वीपणे राबवल्यावर देशातील अथवा देशाबाहेरील अनेक उद्योजक इस्रो मध्ये भांडवल गुंतवण्यासाठी पुढे येतील.  विशेषतः इस्रोने   इतक्या कमी खर्चात ही मोहीम पार पाडलेली आहे की त्यामुळे जगभरातील अवकाशयान प्रक्षेपणाचा व्यवसाय नजीकच्या काळात इस्रो कडे वळेल व त्यामुळे इस्रोमध्ये गुंतवणूक करणे हा व्यवहार फायदेशीर ठरेल अशी चर्चा खाजगी क्षेत्रामध्ये सुरू झालेली आहे.  आपल्या अवकाश विज्ञान संस्थांना मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज आहे.  खाजगी क्षेत्रांकडून हे भांडवल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले, तर या पुढील अवकाश मोहिमा या अधिक दमदारपणे व अधिक चांगले शास्त्रीय निष्कर्ष काढण्याच्या दृष्टीने यशस्वी करता येतील.  

  चंद्रावर मोहीम करून भारतीय शास्त्रज्ञ हे गप्प बसलेले नाहीत, तर पुढच्या दोन किंवा तीन वर्षात अनेक मोहिमांचे  नियोजन आपल्या शास्त्रज्ञांनी यापूर्वीच केलेले आहे.  अगदी लगेचच म्हणजे येत्या सप्टेंबर मध्ये भारत सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य- १ हे अवकाशयान पाठवणार आहे.  सूर्य व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण जेथे समतोल होते, अशी अवकाशात पाच क्षेत्रे आहेत.  त्यांना लँग्राज पॉईंट्स असे म्हणतात.  पृथ्वी जशी सूर्याभोवती प्रदक्षिणा करत जाते त्याप्रमाणे हे लँग्राज पॉईंट्सही सूर्याभोवती फिरत असतात.  या समतोल गुरुत्वाकर्षण स्थानावर आदित्य- १ हे आपले यान जाऊन पोहोचेल.   हे स्थान पृथ्वीपासून पंधरा लाख ते वीस लाख किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.  त्या ठिकाणाहून सूर्याचे निरीक्षण करणे हे अधिक सोपे असणार आहे.  सूर्यावरील उसळणारा प्लाजमा, तिथून प्रचंड वेगाने बाहेर पडणारे सौर वारे, सूर्याच्या वेगवेगळ्या भागात बदलणारे तापमान, सूर्यावरील काळे डाग, सूर्याचा गाभा, करोंना व किरीट यामध्ये होत असलेल्या विविध आण्विक प्रक्रिया या सर्व घटकांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा   परिणाम या सर्वांचा अभ्यास आदित्य- १ हे अवकाशयान करणार आहे.  सौर वादळामुळे उपग्रहांना धोका निर्माण होऊ शकतो, विमानांच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, अथवा दळणवळणाच्या इतर व्यवस्थाही बाधित होऊ शकतात.  त्यामुळे अशा प्रकारे सूर्याचा अधिक सखोल अभ्यास केल्यावर सूर्यावरील बदलांपासून पृथ्वीवर ज्या आपत्तीजनक घटना घडतात त्यावर उपाय शोधणे अधिक शक्य होईल. 

 २०२४ मध्ये भारत गगनयान मोहीम राबवणार आहे.  अवकाशामध्ये आपल्या अवकाश वीरांना घेऊन जाणे व सुरक्षितपणे परत आणणे, अशी ही मोहीम असणार आहे.  गगनयान मोहीम यशस्वी व्हावी, म्हणून त्यापूर्वी दोन वेगवेगळ्या प्रायोगिक यानांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.  अवकाशामध्ये जाऊन आपले अवकाश यात्री अनेक प्रयोग करतील, ज्या प्रयोगांचा उपयोग भावी अवकाश योजनांमध्ये होईल.  आज ना उद्या अवकाशामध्ये आपणही एखादे स्थानक म्हणजे कायम स्वरूपाची निवास यंत्रणा निर्माण करणार आहोत. गगनयान मोहीम ही त्या उपक्रमाची पहिली पायरी असेल.  आज पर्यंत स्वबळावर अवकाश यात्री पृथ्वीच्या कक्षे   बाहेर पाठवण्याचे काम अमेरिका रशिया व चीन या देशांनी केलेले आहे.  असा पराक्रम करणारा आपला चौथा देश ठरेल.  

 मागच्या वेळी भारताने आपली मंगळ मोहीम यशस्वी केलेली होती.  पहिल्याच प्रयत्नात भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेमध्ये योग्य रीतीने स्थिरावले.  त्याने मंगळावरील जमीन व वातावरणाची चित्रे काढून ती पृथ्वीकडे पाठवण्यास सुरुवातही केली.  पुढच्या टप्प्यामध्ये इस्रो चे अवकाश यान मंगळावर उतरून मंगळ भूमीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग करेल. पुढील काही काळामध्ये इस्रोची   शुक्र ग्रहावरही मोहीम जाणार आहे.  शुक्र हा अतिशय तेजस्वी असा ग्रह आहे. हा अतिशय उष्ण आहे, कारण तिथे सूर्याकडून आलेले प्रकाश किरण परत बाहेर फेकले जात नाहीत. शुक्राच्या वातावरणामध्ये सल्फ्युरिक ऍसिडचे ढग आढळतात. त्यामुळे या ग्रहासंबंधीचे कुतूहल सर्व जगभरच वाढीस लागलेले आहे.  इस्रो आपली शुक्र मोहीम ज्यावेळी यशस्वी करेल त्यावेळी शुक्राची अनेक रहस्ये उलगडतील.  

 परंपरागत ज्ञानाची पडताळणी 

 ज्या ठिकाणी चांद्रयान-२ चे लँडर कोसळले होते त्या जागेस तिरंगा पॉईंट असे नाव आपण दिलेले आहे, व ज्या ठिकाणी चांद्रयान-३ चे विक्रम लँडर उतरलेले आहे, त्या स्थानास शिवशक्ती पॉईंट असे नाव देण्यात आलेले आहे.  यासंबंधी बोलताना एस सोमनाथ हे इस्रोचे प्रमुख संचालक म्हणाले की,” विज्ञान क्षेत्रात आम्ही प्रगती करतच आहोत.  परंतु भारतीयांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हे सर्व विज्ञान वेदांमध्ये आधीच सांगितले गेलेले आहे.  ते वेगळ्या पद्धतीने आम्ही पुन्हा प्रकाशात आणतो आहोत.  आपल्या परंपरागत ज्ञानाचा व ऋषीमुनींनी केलेल्या तपश्चर्येचा वारसा आपण जपला पाहिजे.”  

 भारत जवळजवळ बाराशे वर्षे पारतंत्र्यात राहिला.  या काळात आधी मुगल आक्रमक व नंतर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले.  या गुलामीच्या कालखंडापूर्वी भारतामध्ये विज्ञानाची खूप मोठी प्रगती झालेली होती, याचे अनेक पुरावे आजही सापडतात.  आज पृथ्वीपासून हजारो प्रकाश वर्षे अंतरावर असलेल्या अनेक नक्षत्रांची अचूक वर्णने वेदांमध्ये आढळतात.  हबल सारखी दुर्बीण त्यावेळी उपलब्ध नव्हती.  त्यामुळे हे नक्षत्रांचे वेध कसे घेतले गेले असावेत असा अनेकांना प्रश्न पडतो.  त्यावेळी योगशास्त्राच्या आधारे अतिसुक्ष्म कणांपासून अति दूर असलेल्या नक्षत्रांपर्यंत अनेक वस्तूंचे वेध आपल्या ऋषीमुनींनी घेतले व त्यांची वर्णने लिहून ठेवली.  अशाच प्रकारे वनस्पतींच्या विविध भागांच्या गुणधर्मांचा अभ्यास करून आपल्या ऋषीमुनींनी आयुर्वेदासारखे शास्त्र सिद्ध केलेले होते.  त्यावेळी जी माहिती योग क्रियांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी मिळवली, ती माहिती आता वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून आपले शास्त्रज्ञ पुन्हा मिळवू पाहत आहेत.  योगायोग असा की शास्त्रज्ञांनी आज आधुनिक उपकरणांद्वारे घेतलेले वेध व दुरस्थ नक्षत्रांची वर्णने वेदांमध्ये असलेल्या वर्णनांशी तंतोतंत जुळतात.  आज आधुनिक विज्ञानाच्या द्वारे आपण ब्रम्हांडातील अनेक रहस्ये शोधून काढत असताना ही रहस्ये शोधून काढण्याची जी प्राचीन तंत्रे आपल्याकडे उपलब्ध होती, तीही तंत्रे आपल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढावीत.  अध्यात्म व विज्ञान या दोन्हीच्या माध्यमातून जे ज्ञान प्रकट होईल, त्यातून सर्व विश्वाचे कल्याण आपण करू शकू असा सर्व भारतीयांना विश्वास वाटतो.  

facebook
Youtube
Twitter / X