Blog Details

आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती व्यवस्थापन
सौ.शबनम तरडे

सौ.शबनम तरडे

तावद् भयाद्धि भेतव्यं यावद् भयमनागतम् । आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्याद यथोचितम् ।।

अर्थात, संकट जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत संकटाची भीती बाळगावी, परंतु समोर संकट आले असता माणसाने यथोचित कृती करावी. त्या संकटाचा सामना करावा.आपत्ती व्यवस्थापन हा विषय सर्वांच्या अभ्यासक्रमातील आहे.तरीही या विषयासाठीची एक पुस्तिका तयार करण्याची संकल्पना मा.शरद कुंटे सरांनी मांडली.याचे कारण म्हणजे या विषयाचे गांभीर्य आणि या विषयात आवश्यक असलेली तत्परता सर्व विद्यार्थी,पालक व शिक्षकांच्या अंगी यावी,आपत्ती किंवा संकट आल्यानंतर चटकन हाताशी एक मार्गदर्शिका असावी म्हणून ही पुस्तिका नक्कीच उपयुक्त ठरेल.

मा.कुंटे सरांनी या पुस्तिकेच्या निर्मितीची जबाबदारी मोठ्या विश्वासाने माझ्यावर टाकली आणि माझे टिम तयार करण्याचे काम सुरू झाले. आपल्या संस्थेतील विविध शाळांमध्ये कार्यरत असलेले काही क्रीडाशिक्षक घेऊन पुस्तक निर्मिती मंडळ तयार केले. प्रत्येक शिक्षकाने एक-एक विषय घेऊन त्याची सोप्या भाषेत मांडणी करण्याचे निश्चित केले. विषयाची व्याप्ती पाहता हे अवघड काम होते, परंतु 'हे करावे' व 'हे करू नये' या रचनेत पुस्तिका मांडणी करण्याचे ठरले.शाळेतील दैनंदिन कामकाजात सहज समाविष्ट करता येतील अशा लहान-लहान कृती/उपक्रमांचा उल्लेख केला.पालकांबरोबर करून पहावे अशा कृतीही दिल्या आहेत.प्रत्येक विषय आकर्षक मांडणी करून प्रभावी करण्याचे काम श्री.भार्गवराम भागवत यांनी केले.पुस्तकाचे व्याकरण व शुद्धलेखन तपासण्यात श्री.विकास पढेर सरांनी मोलाचे सहकार्य केले.

पुस्तिकेचे मुखपृष्ठ तयार करण्यासाठी संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकडून चित्रे काढून घेतली.त्यातील निवडक चित्रे पुस्तिकेच्या मुखपृष्ठ व मलपृष्ठावर आहेत.बाकीची चित्रे पुस्तिकेत विषयानुसार समाविष्ट केली आहे.पुस्तिका निर्मितीकामी अनेकदा सर्वांशी संपर्क करणे,ऑनलाईन बैठका आयोजित करणे,समन्वय साधणे अशी महत्त्वाची जबाबदारी श्री.प्रीतम जोशी सरांनी पार पाडली.आपत्ती व्यवस्थापन हा सर्वांच्या जीवनशैलीचा एक भाग व्हावा,वैयक्तिक स्तरावर तसेच सामाजिक स्तरावर संकटाला सामोरे जाण्याची वृत्ती तयार व्हावी,मदत करण्याची मानसिकता तयार व्हावी,कुटुंब,समाज,राष्ट्र आणि पर्यावरण या स्तरांवर एक जबाबदारी म्हणून या विषयाकडे सर्वांनी पहावे ही इच्छा !

या पुस्तिकेच्या निर्मितीकामी माझी निवड केली याबद्दल संस्थेचे मा.अध्यक्ष श्री.शरद कुंटे, मा.कार्यवाह श्री.धनंजय कुलकर्णी यांचे आभार मानते.मला मार्गदर्शन करणारे संस्थेचे विश्वस्त श्री.अनंत जोशी यांचेही आभार ! पुस्तिकेसाठी लेखन करणाऱ्या सर्व क्रीडाशिक्षकांचे आभार.कोणत्याही संकटाशी सामना करताना बौद्धिक परिपक्वता व मनाचा निर्धार याची आवश्यकता असते,या पुस्तिकेतून हे दोन्हीही सर्व वाचकांना प्राप्त होवो ही शुभेच्छा !पुस्तिका प्रकाशित होत आहे याचा आनंद आहेच,पण यांतील उपक्रम जेव्हा प्रत्यक्ष सरावासाठी वापरले जातील,आपले विद्यार्थी जास्तीत जास्त याचा वापर करतील तेव्हा खऱ्या अर्थाने पुस्तिकेचा उद्देश सफल होईल.धन्यवाद !

facebook
Youtube
Twitter / X