Blog Details

विज्ञान व तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते - लोकमान्य टिळक

विज्ञान व तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते - लोकमान्य टिळक
Dr. Sharad Kunte

Dr. Sharad Kunte

लोकमान्यांच्या नेतृत्वाचे अनेकविध पैलू

लोकमान्य  टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक मानले जातात.  ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध भारतीय जनतेला संघर्षासाठी उद्युक्त करणारे सर्वात पहिले लोकनेते म्हणून लोकमान्यांना  मान्यता आहे.  परंतु त्यांच्या राजकीय क्षेत्रातील या हिमालया एवढ्या कर्तृत्वापुढे इतर क्षेत्रातील त्यांचे योगदान अनेकदा थोडेसे दुर्लक्षित राहते. भारतीय राष्ट्राच्या उत्कर्षाच्या अनेक पैलूंवर लोकमान्यांनी  सखोल चिंतन केलेले होते व त्या प्रत्येक पैलू मध्ये आपल्या राष्ट्राचा उत्कर्ष व्हावा यासाठी त्यांनी तपशीलवार मांडणी केलेली होती. 

सुदैवाने केसरी व मराठा ही वृत्तपत्रे त्यांच्या हाताशी असल्यामुळे त्या वृत्तपत्रातील लेखाद्वारे हे विषय लोकमान्य सर्व समाजापर्यंत पोहोचवू शकले.  परंतु लोकमान्य हे केवळ कार्यालयात बसून समाजाला मार्गदर्शन करणारे पुढारी नव्हते.  ते खरेखुरे जनतेचे प्रतिनिधी होते.  त्यामुळे आपल्या मनातील जनतेच्या उत्कर्षासाठी असलेल्या प्रत्येक योजना ते देशभर फिरून, थेट जनतेत मिसळून सर्वांसमोर मांडत असत. 

राजकीय व्यासपीठावरून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध जनमत जागृतीसाठी शेकडो भाषणे केलेली होती, तशी अनेक उद्योजक व तंत्रज्ञांना भेटून या देशात उद्योगधंद्यांची प्रगती व्हावी, रोजगार निर्मिती व्हावी यासाठीही त्यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केलेले होते. राष्ट्रीय शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय लोकमान्यांनी  उचलून धरला व आपल्या  आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची अशी किमान दहा वर्षे या कामासाठी त्यांनी दिली.  डेक्कन एज्युकेशन सोसायटीची निर्मिती ही त्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाची होती हे लोकमान्यांनी  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना त्यांच्या  निवेदनामध्ये प्रकट केलेले आहे.  लोकमान्यांना  या देशातील शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची कल्पना होती.  या दैन्यावस्थेतून शेतकरी बाहेर यावेत यासाठी अनेक उपाययोजना त्यांनी शासनकर्त्यांस समोर मांडल्या होत्या.  त्या उपाययोजना अमलात आणण्याची शासनाची कधीच इच्छा नव्हती हा भाग वेगळा.  परंतु त्यानिमित्ताने नेमक्या  कोणत्या दिशेने प्रयत्न केले तर आपल्या देशातील सर्व सामान्य जनतेचे दारिद्र्य दूर होईल यासंबंधीचे नेमके मार्गदर्शन लोकमान्यांनी  केलेले होते.

शेती विकासाशिवाय ग्रामीण भागात समृद्धी येणार नाही व उत्तम तंत्रज्ञानाशिवाय शेती विकास होऊ शकणार नाही

 लोकमान्य हे अनेकदा स्पष्टपणे बोलून दाखवत असत की आपल्या देशातील ८० % समाज केवळ शेतीवर उदरनिर्वाह करीत आहे ही आपल्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची ठरणारी गोष्ट आहे.  कमीत कमी मनुष्यबळाच्या मदतीने शेतीची जास्तीत जास्त कामे करता आली पाहिजेत व उरलेल्या मनुष्यबळाच्या वापराने शेतीपूरक उत्पादने किंवा मूल्यवर्धित उत्पादने तयार केली गेली पाहिजेत तरच शेती उद्योगात बरकत येईल. यासाठी शेतीमध्ये अधिक संशोधन झाले पाहिजे, अधिक प्रगत तंत्रज्ञान शेतीला उपलब्ध झाले पाहिजे.  भारतामध्ये शेतीतून जे उत्पन्न मिळते त्याच्या कितीतरी अधिक पट उत्पन्न तेवढ्याच जमिनीमध्ये जगभरातील अनेक देशांमध्ये प्राप्त केले  जाते, व त्यामुळेच त्या त्या देशांमध्ये शेतीच्या माध्यमातून समृद्धी सर्वसामान्य जनतेपर्यंत येऊन पोहोचलेली आहे.  हा फरक तेथे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आलेला आहे.  शेतकरी कष्ट भरपूर करतो परंतु कष्टांना तंत्रज्ञानाची जोड नसेल तर योग्य त्या प्रमाणात व योग्य त्या दर्जाचे  उत्पादन मिळणे शक्य नाही व भारताचा उत्कर्ष होणे शक्य नाही म्हणून शेती प्रक्रिये संबंधात व शेतीपूरक उत्पादनांच्या मूल्यवर्धन करणाऱ्या उद्योगांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान उपयोगात आणले पाहिजे.  शक्य असेल तर ते नवीन तंत्र किंवा नवीन प्रक्रिया, शेतीमध्ये वापरली  जाणारी बी बियाणे, खते, कीटकनाशके व शेती उद्योगातील विविध साधने निर्माण करण्याचे तंत्रज्ञानआपल्या देशात निर्माण केले पाहिजे व ते शक्य नसेल तर विदेशामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान शिकून घेऊन त्याचा या ठिकाणी कसा उपयोग करता येईल याचा विचार केला गेला पाहिजे, असे ते आग्रहाने प्रतिपादन करत असत. संकरित बियाणे लांब धाग्याच्या कापसाच्या संदर्भात भारतामध्ये उपयुक्त ठरेल असेही मत त्यांनी आपल्या लेखांमधून मांडलेले होते.  जपान अमेरिका व तत्सम इतर देशांमध्ये शेती सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते याची माहिती घेऊन त्या त्या प्रकारच्या सुधारणा येथे करण्यात याव्यात असा आग्रह ते आपल्या अग्रलेखांमधून शासनाकडे करत असत.

इंग्रजांनी कधीही शेती संशोधन या विषयावर भर दिला नाही.  आपल्या शिक्षणक्रमामध्ये शेती विषयाचा अंतर्भाव करावा, शेतीविषयक संशोधनांचा विद्यापीठांमध्ये अंतर्भाव करावा, यासंबंधी लोकमान्यांनी अनेक लेख  लिहिलेले आहेत. केवळ संशोधन होऊन भागणार नाही अथवा नवीन तंत्रज्ञान केवळ उपलब्ध होऊन भागणार नाही, तर ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक लोक चळवळ हाती घ्यावी लागेल ही दृष्टी त्यांनी सर्व ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलेली होती. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्याला योग्य वेळी योग्य प्रमाणात शेतीला पाणी देता आले पाहिजे याची त्यांना जाणीव होती.  पाणीपुरवठा होण्यासाठी पाटबंधारे, धरणे, विहिरी, यांची शेती उत्पादनासाठी उपलब्धता कशा प्रकारे करता येईल यासंबंधीचे विचारही त्यांनी प्रसंगानुरूप  मांडलेले आहेत. 

रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंदे हवेत व उद्योगधंद्यांच्या निर्मितीसाठी भांडवल तसेच तंत्रज्ञानही हवे.

भारताच्या समृद्धीसाठी असलेली सर्वात महत्त्वाची अट म्हणजे रोजगार निर्मिती ही आहे.  ही समस्या आजही आहे व लोकमान्य यांच्या काळीही होती.  सर्वच जण शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेती व्यतिरिक्त रोजगाराची साधने जवळपास उपलब्ध नव्हतीच.  इंग्रजांनी भारतामध्ये आपली राजसत्ता दृढ  करण्यासाठी दोन महत्त्वाच्या घटकांवर आघात केलेला होता.  त्यातला एक घटक इथली शिक्षण व्यवस्था व दुसरा घटक येथील औद्योगिक उत्पादने.  शिक्षण व्यवस्था नष्ट करण्यामध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला होता.  त्यांना या ठिकाणी केवळ शिपाई व कारकूनच तयार करायचे होते.  उत्तम दर्जाचे शास्त्रज्ञ व उद्योजक निर्माण व्हावेत ही त्यांची इच्छाच नव्हती.  या देशाने केवळ कच्च्या मालाच्या उत्पादनाचे काम करावे व तो कच्चा माल ब्रिटनला पाठवावा. आपल्या देशात त्याच्यावर यांत्रिक प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल  तयार करून तो भरपूर जास्त किमतीमध्ये भारतात विकावा अशीच इंग्रजांची अर्थनीती होती.  या प्रक्रियेत इंग्रज भरपूर नफा मिळवू शकत होते.  त्यातून भारतातील उद्योगधंदे नष्ट होत गेले व भारतातील संपत्ती ही ब्रिटनकडे वहात राहिली. जेष्ठ  विचारवंत शशी धरून यांनी केलेल्या मांडणीनुसार १५०  वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत इंग्रजांनी सुमारे ५०  लक्ष कोटी रुपये हे भारतातून लुटून परदेशात नेलेले होते.  त्यावेळेच्या एका रुपयाची किंमत आजच्या तुलनेत १००  पट अधिक होती हे लक्षात घेतले तर भारताची किती मोठी हानी इंग्रजांनी केली हे आपल्या लक्षात येईल.  ही हानी भरून काढण्यासाठी या ठिकाणी उद्योगधंदे पुन्हा उभे राहिले पाहिजेत व उद्योगधंदे पुन्हा उभे राहण्यासाठी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी देशातील बुद्धिमान युवकांनी  पुढे सरसावले पाहिजे असा लोकमान्यांचा आग्रह होता.  राष्ट्रीय शिक्षण या विषयाचा तो एक महत्त्वाचा आयाम होता.

विज्ञान व तंत्रज्ञान यांची मदत केवळ शेती क्षेत्रामध्ये आवश्यक आहे असे नाही.  प्रत्येक गावामध्ये असलेले बारा बलुतेदार व अशाच प्रकारची लहान मोठी कामे करणारे शहरातील कारागिर यांच्या उत्पन्नात चांगल्या प्रमाणात वाढ घडवून आणण्यासाठी त्यांची अवजारे व उपकरणे अद्ययावत होणे आवश्यक आहे.  त्या उपकरणांच्या मदतीने त्यांना अधिक चांगल्या दर्जाची उत्पादने निर्माण करता आली पाहिजेत, ही लोकमान्यांची  दृष्टी होती.  लोकमान्य यांचे जवळचे स्नेही व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक सदस्य श्री.  नामजोशी यांना लोकमान्यांनी या कामासाठी उद्युक्त केलेले होते. नामजोशी यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल याची चांगली जाण होती.  त्यामुळे पुणे व भोवतालच्या परिसरामध्ये त्यांनी अनेक उद्योगांना चालना  देण्याचे काम केले.  त्यापैकी जे उद्योग नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ शकले, ते पुढे टिकले व वाढले.  लोकमान्यांनी  पैसा फंड योजनेतून सुरू केलेला तळेगावचा काच कारखाना व मुंढव्याचा तसेच जुन्नरचा कागद निर्मितीचा कारखाना ही त्याची दोन उत्तम उदाहरणे आहेत. 

 

राष्ट्रीय शिक्षणात कृषी, उद्योगधंदे व व्यापार यांचेही विज्ञान व तंत्रज्ञान देण्याची योजना

लोकमान्य राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला.  हे शिक्षण केवळ भाषा, विज्ञान व गणित यांच्या पुरते मर्यादित नव्हते, तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण व्हावेत यासाठी कृषी,उद्योगधंदे व व्यापार यांचेही शिक्षण देण्याचा विचार यामध्ये केला गेलेला होता. उद्योगधंदांना जशी तंत्रज्ञानाची आवश्यकता असते तशीच अर्थ पुरवठ्याचीही आवश्यकता असते.  त्यामुळे बँका व पतपेढ्या कशा चालवाव्यात याचेही ज्ञान बुद्धिमान विद्यार्थ्यांनी करून घ्यावे असा विषय त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अनेकदा मांडलेला आहे.  या क्षेत्रामध्ये प्रगती करून भारताने आपली स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करावी यासाठी इंग्रज मदत करणे शक्यच नव्हते.  भारतीयांना हे ज्ञान स्वतःच्या परिश्रमातूनच मिळवावे लागणार होते.  विदेशातून अशा प्रकारे हे ज्ञान देण्यासाठी अनेक तज्ञ व्यक्ती उपलब्ध होत्या.  त्यांच्याशी संपर्क साधून अर्थविज्ञान शिकून आलेले विद्यार्थी या देशात कार्यरत झाले पाहिजेत, असा त्यांचा विचार होता.

“व्यापार वृद्धी झाली तर देशात उत्पादित होणाऱ्या प्रत्येक पदार्थाचे अर्थामध्ये रूपांतर होते व देशाची समृद्धी वाढते.  व्यापार वृद्धीसाठी अनेक प्रकारचे शिक्षण दिले जाण्याची गरज आहे.  व्यापार कोणत्या वस्तूंचा करावा, कुठे करावा, तयार होणारा माल  कुठे नेऊन विकावा, कुठे नफा अधिक होतो, याचे ज्ञान मिळाल्याशिवाय समाज व देश व्यापारात पुढे जाऊ शकत नाही.  कोणत्या समाजाबरोबर कोणत्या वस्तूंचा व्यापार करावा, सर्वत्र सर्वच जिनसा  उत्पन्न होत नाहीत.  म्हणून कोणत्या जिनसांची  विविध भागातील समाजाला कशा स्वरूपाची गरज आहे, याचे ज्ञान याचे शिक्षण भारतीयांना गरजेचे आहे. औद्योगिक क्रांतीमुळे व ब्रिटिशांच्या साम्राज्यामुळे भारतीयांचा व्यापार ठप्प झालेला होता.  व्यापार धंद्यात नवीन बदल होऊन विविध प्रदेशातील समाजाच्या गरजा व मागण्या यांचे स्वरूप बदलत चालले होते.  या अशा बदलत्या व्यापाराचे स्वरूपाचे  ज्ञान भारतीयांचा व्यापार वाढवण्यासाठी होणे आवश्यक होते.  भारतीय लोक व्यापारात उतरल्यावर व्यापारातून होणारा  नफा भारतीयांच्याच खिशात पडणार आहे त्यामुळे भारताची आर्थिक स्थिती निश्चितपणे सुधारेल” असे विचार  लोकमान्य मांडत असत. विशेषतः विदेशांशी  होणारा व्यापार इंग्रजांनी आपल्याच कंपन्यांच्या ताब्यात ठेवलेला होता.  त्यामुळे भारताबाहेर एखाद्या वस्तूला कुठे अधिक किंमत मिळेल, त्या ठिकाणी जाऊन व्यापार करण्याचे स्वातंत्र्य अनुभव व तेथील परिस्थितीचे ज्ञान भारतीयांना नव्हते.  ते प्राप्त करून घेणे हे भारताच्या हिताचे आहे व आपण ते आग्रहपूर्वक मिळवले पाहिजे असे लोकमान्य प्रतिपादन करत असत. 

 गणित व ज्योतिर्विज्ञान शास्त्रातील प्रकांड पंडित

स्वतः लोकमान्य हे गणित व ज्योतिर्विज्ञान या विषयातील प्रचंड पंडित होते. विज्ञान विषयाच्या अभ्यासकाने गणित विषयांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेच पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते.  ते म्हणतात,” गणिताची ज्याला  गोडी नाही किंवा गणितात ज्याचे डोके शिरत नाही, त्याची विचारसरणी एक प्रकारे अपक्व राहते. गणिताच्या योगाने विचारांची साखळी अत्रुटीत व सुसंबद्ध  होते .”  राष्ट्रीय शिक्षणाच्या योजनेतून त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा सुरू केली त्यावेळी सुरुवातीच्या काही काळात ते या शाळेतील विद्यार्थ्यांना गणित शिकवण्या साठी स्वतः उभे राहिले होते. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाल्यावरही तेथे त्यांनी काही काळ गणिताचे अध्यापन केले.  यावरून त्यांची गणित या विषयावरील आवड लक्षात येते. लोकमान्यांनी  एका ठिकाणी असे लिहून ठेवले आहे,” मी जर राजकारणात गेलो नसतो तर गणित व ज्योतिर्विज्ञान या विषयात संशोधनाचे कार्य मी केले असते.”  लोकमान्यांना  जेव्हा जेव्हा तुरुंगवास झाला किंवा अन्य काही कारणामुळे थोडी फुरसत प्राप्त झाली, तेव्हा त्यांनी ज्योतिर्विज्ञान या विषयावरती लिखाण केलेले होते. आकाशस्थ ग्रहगोलांच्या गती गणिताच्या आधारे समजून घेता येतात व त्या ग्रहगोलांची स्थिती जशी बदलते तसे  त्या ऐतिहासिक घटनाक्रमांचे  कालमापन करणे शक्य होते.  यात सिद्धांताचा उपयोग करून त्यांनी वेद, उपनिषदे ,रामायण व महाभारत यांची कालनिश्चिती करून दाखविली.

आकाशात जशी गृह स्थिती दिसते, तशी तुम्ही पंचांगात मांडलेल्या गणिताप्रमाणे दाखवून देता आली पाहिजे.  ती जर दाखविली जात नसेल, तर त्या पंचांगाची  दुरुस्ती केली गेली पाहिजे. जुन्या भारतीय पंचांगांमध्ये अशा त्रुटी अनेकदा दिसून येत असत. त्या दूर करण्यासाठी लोकमान्यांनी नवीन पंचांगाची निर्मिती केली. ही निर्मिती पूर्णपणे शास्त्रीय आधारावर सिद्ध केली गेली.

‘ओरायन’ व ‘आर्टिक होम इन वेदाज’ हे त्यांचे ज्योतिर्विद्या शास्त्रावर आधारित प्रमुख ग्रंथ.  त्यांचा तिसरा ‘वैदिक क्रोनॉलॉजी’ हा ग्रंथ मात्र अपुरा राहिला. त्यांचे लिखाण आजही त्या क्षेत्रात प्रमाणभूत मानले जाते. स्वतः अशा प्रकारे शास्त्र विषयाचे अभ्यासक असल्यामुळे लोकमान्यांना  शास्त्र विषयाच्या प्रगती संबंधांमध्ये आस्था होतीच. त्यामुळे विविध शिक्षण संस्थांमध्ये शास्त्र विषयाचा अभ्यास चालू रहावा असा विषय ते अनेक शिक्षण तज्ञांशी  बोलताना मांडत असत व त्याचबरोबर मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला उपयोगी पडणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये करता यावा, असे ते ठिकठिकाणी विद्यार्थ्यां समोर केलेल्या व्याख्यानांमध्ये प्रतिपादन करत असत. त्यांनी सुशिक्षित व्यक्तीची व्याख्या अशी केली,       ” आपल्या शिक्षणाचा जो देशासाठी उपयोग करतो तोच सुशिक्षित.”

विज्ञानात प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही

आपल्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अनेक लेखांमधून मार्गदर्शन केलेले आहे.  एका ठिकाणी ते असे म्हणतात,” शास्त्रीय विषयांचे अध्ययन करतेवेळी प्राच्च  व पाश्चात्य हा भेद न मानता सत्याचेच मधुकर वृत्तीने ग्रहण केले पाहिजे. “ शास्त्राचा अभ्यास किती प्रमाणात झालेला आहे याची कसोटी संशोधन कार्य करताना आपोआपच लागते.  परंतु संशोधन कार्य करताना प्रत्येक वेळीच एखादा मोठा शोध लागेल असे सांगता येत नाही.  लोकमान्य म्हणतात,” सर्वच शास्त्रीय शोध प्रथमतःच काही परिपूर्ण नसतात.  म्हणून जे असतात ते अमलात आणताना चांगली सावधगिरी नेहमी राखली पाहिजे.” शास्त्रीय अभ्यासातून प्रत्येक विषयाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याचा एक स्वभाव तयार होतो व त्यातून जीवनाला एक शिस्त प्राप्त होते.  हा जसा भाग आहे, तसेच शास्त्रीय दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची सवय लागली की सर्वसामान्य जीवनात येणाऱ्या लहान मोठ्या अडचणींवर काही ना काही मार्ग काढण्याची युक्ती सर्वसामान्य माणसालाही सुचवू शकते.  या युक्तीलाच व्यवहारामध्ये तंत्रज्ञान असे म्हणतात.  शास्त्र व तंत्रज्ञान यांची उपासना बरोबरीने करत राहणे हाच राष्ट्राच्या प्रगतीचा निश्चित असा मार्ग आहे.

 लोकमान्यांच्या काळामध्ये भारतामध्ये प्रगत अशा शास्त्रीय प्रयोगशाळा विकसित झालेल्या नव्हत्या.  शास्त्र अभ्यासक हे प्रामुख्याने वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकवणारे प्राध्यापक व त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात संशोधन कार्य करत असलेले असे अभ्यासक होते.  परंतु अशा शास्त्रज्ञांशी बोलताना लोकमान्यांनी  त्यांना अशी प्रेरणा दिली की तुम्ही आपले काम प्रामाणिकपणे करा.  शास्त्र विषयांमध्ये तुम्ही काही उत्तम काम करून दाखवले तर ते काम देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळी करण्या  इतकेच  महत्त्वाचे आहे, याविषयी विश्वास बाळगा. शास्त्राचा अभ्यास करत असताना कोणाची बौद्धिक गुलामगिरी कधीही स्वीकारू नका.  जे  संशोधन आपल्या हातून होईल, ते देशाच्या हितासाठी कारणी लागले पाहिजे.  लोकमान्यांनी  दिलेल्या या आदेशानुसारच यापुढील अनेक शास्त्रज्ञांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवली, असे  दिसून येते. डॉ.जगदीश चंद्र बसू, प्रफुल्लचंद्र राय, चंद्रशेखर वेंकट रमण यासारखे दिग्गज शास्त्रज्ञही अत्यंत कडवे देशभक्त होते.  त्यांनी इंग्रजांसमोर कधीही कमीपणाची भूमिका स्वीकारली नाही.  आपल्या शास्त्रीय ज्ञानामध्ये कुठेही कमतरता राहू दिली नाही व आपण करत असलेल्या प्रत्येक संशोधनाचा देशाच्या प्रगतीला अधिकाधिक उपयोग कसा होईल याकडे त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. 

 लोकमान्यां  सारखी विभूती कोणत्याही देशात युगातून एखाद्याच वेळी अवतरते.  लोकमान्यांची प्रतिभा विलक्षण होती.  अतिशय कठीण अशी आव्हाने समोर असतानाही त्यांनी संपूर्ण देशाला जागृत करण्याचे अभूतपूर्व कार्य केले व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांसमोर एक आदर्श प्रस्तुत केला.  त्या पिढीतील बसू अथवा राय  यांच्यासारखे शास्त्रज्ञ असोत, अथवा सावरकरांसारखे क्रांतिकारक असोत, की रवींद्रनाथ ठाकूर यांच्यासारखे साहित्यिक व शिक्षण तज्ञ असोत, ते लोकमान्य यांच्या कर्मयोगाच्या सिद्धांतावर आधारित असा आपला जीवनक्रम आचरत राहिले.  अशी अशा हजारो कर्मयोगी महानुभावांच्या प्रयत्नातूनच या देशाला पुढे स्वातंत्र्य प्राप्त झाले. 

facebook
Youtube
Twitter / X